देवरुख:- देवरुख येथील ८० वर्षीय शारदा संसारे खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या चौकशीत मुलानेच आईचा खून केल्याचे समोर आले आहे. मात्र खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शहरातील गजबजलेल्या ठिकाणी क्रांतीनगर येथे महिलेचा खून झाल्याची घटना समोर आली होती. एका वृध्दवर वार करून तिचा मृतदेह टेरेसवरील पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला होता. शारदा दत्तात्रय संसारे (८०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मुलगा दिपक संसारे याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिस खून झाल्याच्या दृष्टीने तपास करत होते. मुलावर पोलिसांचा दाट संशय होता. परंतु तो सतत गुंगारा देत होता. पोलिस वारंवार त्याला चौकशी साठी ताब्यात घेत होते. परंतु पुरेसे पुरावे नसल्याने त्याला ताब्यात घेण्यात अडचणी येत होत्या. शेवटी पोलिसांनी आज पुन्हा एकदा ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली. यावेळी मुलानेच कट रचून आईचा खून केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. डोक्यात घाव घालून त्याने आईचा खून का केला हे पोलिस तपासात उघड होईल.