रत्नागिरी:- तालुक्यातील खंडाळा येथील घराच्या अंगणात पार्क केलेली दुचाकी चोरल्याप्रकरणातील आरोपीला न्यायालयाने सोमवारी 1 वर्ष कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.दुचाकी चोरीची ही घटना 7 ऑक्टोबर 2018 रोजी घडली होती.
रेहान बाबामियाँ मस्तान (32,रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत दत्तात्रय गोपाळ बिवलकर (रा.खंडाळा,रत्नागिरी) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यानुसार,त्यांनी आपली दुचाकी (एमएच-07-जे-2640) घरासमोरील अंगणात पार्क करुन ठेवलेली होती.ती अज्ञाताने चोरुन नेल्याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.तत्कालिन पोलिस निरीक्षक इंद्रजित काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड काँस्टेबल एस.एम.साळवी तपास करत होते.
तपास करताना पोलिसांनी रेहान मस्तानला अटक करुन त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होेते.या खटल्याची सुनावणी होउन सोमवारी न्यायालयाने निकाल देताना मस्तानला दोषी ठरवून 1 वर्ष कारावास आणि 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.तसेच दंड न भरल्यास साध्या कैदेची शिक्षाही सुनावली.या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अॅड.प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले असून पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार नलावडे यांनी काम पाहिले.