रत्नागिरी:- हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असतानादेखील घरात न राहता समाजात वावर करून दापोली तालुक्यातील काळकाई कोंड परिसरात फिरल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर कोरोनाबाधित रूग्णाविरोधात दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. ४ ते ५ मे दरम्यान ही घटना घडली आहे.
दापोली तालुक्यातील दोन तरूण नुकतेच कोरोनाबाधित सापडले आहेत. हे दोन्ही तरूण मुंबई येथून आले होते. त्यांना चेकपोस्टवर अडवून क्वारंटाईन केले होते. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. मात्र अहवाल येण्यापूर्वीच क्वारंटाईन असलेला एक तरूण समाजात सर्वत्र वावरला होता. नुकताच त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या भेटीगाठीच्या घटना पुढे येऊ लागल्या आहेत. दापोलीतील काळकाई कोंड परिसरातदेखील तो फिरला असल्याची माहिती मिळाली आहे.
याप्रकरणी तालुका आरोग्य पर्यवेक्षक सुभाष गिल्या पाडवी यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी त्या कोरोनाबाधित रूग्णाविरोधात भादंविक १८८, २६९, २७०, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ब, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम २, ३, ४, महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना कायदा २०२० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो. हे. कॉ. गुजर करीत आहेत.