शासकीय वाहनांची दुरुस्ती होणार एसटी वर्कशॉप मध्ये
रत्नागिरी : कोरोना महामारीमुळे एसटीचा आर्थिक पाय आणखी खोलात गेला. यातून सावरण्यासाठी एसटी महामंडळाने पर्याय काढत माल वाहतूक सुरू केली. त्यापुढे जात आता शासकीय वाहनांची दुरुस्ती एसटीच्या वर्कशॉपमध्ये होणार आहे.
तसेच गरजेनुसार एसटीचे चालक शासकीय वाहने चालविण्यासाठी उपलब्ध करून देण्याची महामंडळाने तयारी केली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्ह्यांचा सर्व्हे करण्याचे आदेश देण्यात आले असून, तसा अहवाल महामंडळाला दिला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पाटबंधारे, कृषी विभाग अशा सर्व शासकीय कार्यालयातील वाहनांच्या देखभालीची जबाबदारी घेण्याची तयारी सुरू केली आहे.
त्यानुसार शासकीय वाहनांचा सर्व्हे सुरू झाला आहे. शासकीय कार्यालयांना भेटी देऊन त्यांची वाहने कोणत्या कंपनीची आहेत, दुरुस्तीवर होणारा खर्च किती असेल यासह विविध बाबींचा सर्व्हे दहा दिवसांत पूर्ण केला जाणार आहे. तो अहवाल महामंडळाला पाठविला जाईल. त्यानंतर यावर निर्णय होईल, अशी माहिती वाहतूक अधिकारी अनिल म्हेत्तर यांनी दिली.