ट्रक डोंगरकड्यावर आदळल्याने आंबा घाटात एक ठार, एक गंभीर

साखरपा:- कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात काल गुरुवारी एक ट्रक नियंत्रण सुटल्याने डावीकडील डोंगरकड्यावर आदळून त्यात एक महिला ठार झाली. दूसरे एकजण गंभीर आहेत. ट्रकचा चालक फरार आहे.

याबाबतची माहिती अशी- काल ट्रक एमएच ११- डी डी ०९६७ कोल्हापूरहून जयगडकडे चालला होता. त्यात रत्नागिरीकडे जाणारे काही प्रवाशी बसले होते. हा ट्रक आंबा घाटात आला असता त्यावेळी एका चक्री वळणावर  चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रक घाटातील डाव्या बाजूच्या डोंगरकड्यावर जोरात आदळला. 

या अपघातात त्यातील प्रवाशी  महिला सोनाबाई सखाराम लावनदे (वय ५८) या ठार झाल्या. त्यातील दुसरे प्रवाशी ज्योतीबा बाबुराव लवनदे (वय ५२)हे गंभीर जखमी आहेत. 

या ट्रकमध्ये वासोळे, जि. सातारा येथील एकाच कुटुंबातील  आई, वडील, बहीण, मावस बहीण असे नातेवाईक बसले होते. त्यातील रामकृष्ण सखाराम लवनदे, सोनाक्का बाबुराव लवनदे, स्वाती प्रदीप पिसाळ, आरती योगेश झरंडे यांना किरकोळ मार लागला आहे.

दरम्यान अपघाताची माहिती क्षेत्र नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या हातखंबा येथील रुग्णवाहिकेला मिळाली.  ती तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यातून मृत व जखमींना साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. अपघातातील ट्रकच्या डाव्या बाजुचे नुकसान झाले आहे. ट्रक चालक फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच देवरुख पोलिस ठाण्याचे एपीआय. विक्रम पाटील, हेडकॉन्स्टेबल भुरकर, कॉन्स्टेबल शिंदे तातडीने घनस्थळी पोहोचले व जखमींना सहकार्य केले. पंचनामा केला.