जॅकवेल दुरुस्तीच्या कामात कामगार अडकल्याने मोकाट जनावरे पकडण्याच्या नियोजनावर पाणी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणार्‍या शीळ धरणावरील जॅकवेल कोसळली. येथील कामासाठी रत्नागिरी नगर परिषदेचे कामगार पाठवावे लागल्याने रस्त्यांवरील मोकाट गुरे पकडण्याच्या नियोजनावर पाणी फेरले गेले आहे.

गौरी – गणपती विसर्जनापूर्वी सर्व मोकाट गुरे पकडून चंपक मैदावरील तात्पुरत्या निवार्‍यात ठेवण्याचे नियोजन रत्नागिरी नगर परिषदेने केले होते. येथील निवार्‍याच्या ठिकाणी शेडचे काम पूर्ण झाले असून मंगळवारी निवारास्थळाच्या सभोवताली तारेचे कुंपण घालण्याचे काम सुरू होते.

रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर फिरणार्‍या मोकाट गुरांना पकडण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेवर चोहोबाजूंनी आरोप होऊ लागले. ही गुरे कुठे ठेवायची याबाबत निश्चिती नसल्याने ती पकडण्यावर मर्यादा आल्या होत्या. मात्र पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्पुरती शेड बांधून तेथे पकडलेली गुरे ठेवण्यासाठी तात्पुरती शेड उभारण्यासाठी औद्योगिक महाविकास मंडळाला सूचना केल्या.

त्यानुसार जागा ताब्यात आल्यानंतर रत्नागिरी नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने मोकाट गुरांना पकडून निवारा शेडमध्ये आणून ठेवण्याचे नियोजन केले. गौरी- गणपती विसर्जनापूर्वी रस्त्यावरील सर्व गुरे चंपक मैदानावरील निवार्‍याच्या ठिकाणी आणून ठेवण्याचे नियोजन केले. परंतु तत्पूर्वी शीळ धरणावरील जॅकवेल कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे गुरे पकडण्यासाठी असलेल्या कामगारांना धरणाच्या ठिकाणी आवश्यक कामे करण्यासाठी पाठवावे लागले.

पाणी समस्या सोडविण्यासाठी प्राध्यान्य दिले गेल्याने मोकाट गुरे पकडण्याचे काम लांबणीवर पडले आहे. चंपक मैदानावर ज्या ठिकाणी गुरांना ठेवले जाणार आहे, तेथे शेड उभारण्यात आली आहे. पाण्याची टाकी, वीज पुरवठा आणि सभोवताली तारेचे कुंपण घालण्याचे काम सुरू
आहे.