रत्नागिरी:- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला १७८ कोटीच्या नवीन पाणी पुरवठा योजनांमुळे बुस्टर मिळाला असताना प्राधिकरणाने जिल्ह्यातील १८६ कोटीच्या आणखी ६ योजना प्रसावित केल्या आहेत. त्यामध्ये सर्वांत मोठ्या मिऱ्या-शिरगाव या पाणी पुरवठा योजनेचा समावेश असून त्यामध्ये ३७ गावांचा समावेश आहे. तसेच गणपतीपुळे येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या पारड्यात आणखी काही योजना पडण्याची शक्यता असल्याने अशक्त बनलेले प्राधिकरण आता सशक्त होणार आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आता अच्छे दिन आले आहेत. एकेकाळी विदर्भ मराठवाड्यातील कार्यालयांवर अवलंबुन राहावे लागणारे हे कार्यालय आता मजबूत आणि भक्कम होऊ लागले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये या कार्यालाने जिल्ह्यातील १७८ कोटीच्या पाणी योजनांची कामे केली. त्यापैकी बहुतांशी कामे पुर्ण झाली, काही अंतिम टप्प्यात आहेत, तर अपवादात्मक वादातीत आहे. त्यामुळे या कार्यालयाकडे सध्या प्रचंड काम असले तरी आणखी काही योजना या कार्यालयाच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील ६ पाणी योजनांचे प्रस्ताव मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. आताच काम वाढल्याने मनुष्यबळाची कमतरता या कार्यालयाला भासत आहे.
चिपळूण तालुक्यातील ओवळी कळकवणे वालोपे पाणी योजनेचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ही योजना ११ केटी २६ लाखाची आहे. ६ हजार ६०३ लोकवस्तीचा विचार करून ती प्रस्तावित केली आहे. कोयनेच्या अजलावर ही योजना आधारित आहे. संगमेश्वर तालुक्यासाठी प्रादेशिक पाणी योजना प्रस्तावित आहे. ११ कोटी ९ लाखाची ही योजना असून ९ हजार ४६४ लोकसंख्येचा विचार करून ती तयार केली आहे. राजापूर तालुक्यातील पांगरी बुद्रुक ही २५ कोटी ६५ लाखाची योजना आहे. त्यामध्ये सुधारणा करून १४ गावांतील १२ हजार २१७ लोकांसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. तसेच राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १ कोटी २० लाखाची पाणी योजना आहे.
मिऱ्या-शिरगावसाठी बावनदीवरून पाणी उचलण्यात येणार आहे. खेडशी येथील चांदसुर्या स्पॉटजवळ योजना केली जाणार आहे. तेथून मिऱ्या, शिरगाव, निवळी, हातखंबा, नाचणे, अशा ३७ गावांचा यामध्ये समावेश आहे. १३४ कोटी ३० लाखाची ही योजना आहे. मंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नातून ही योजना पुढे गेली आहे.