जीआय टॅगिंगमार्फत होणार वृक्षगणना 

रत्नागिरी:- शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमाआधी पूर्वनियोजन कार्यक्रमाअंतर्गत लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची माहिती मिळावी यासाठी भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जीआयएस टॅगिंग) करून वृक्षांची गणना करण्यात येणार आहे. यासाठी तांत्रिक सल्लागार नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जुलै मध्ये करण्यात येणार्‍या शत कोटी वृक्ष लागवडी आधी ही प्रक्रीया जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. झपाटयाने वाढणारे  नागरीकरण, त्यामुळे जंगलाचा होणारा -हास  रोखण्यासाठी  वृक्ष गणना आणि चाचपणी करताना वृक्ष संवर्धन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
 

वनीकरणाचा पट्टा वाढावा व पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी वृक्षारोपणासारखे विविध उपक्रम राबविले जात आहेत; परंतू शासनाच्या नवीन धोरणानुसार भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे वृक्षगणना केली जाणार आहे. या गणनेत वृक्षाची प्रजाती, नाव, फळजाती, उंची, वय, घेर, रंग, सुवास, वृक्षाची शास्त्रीय माहिती, त्याचा उपयोग अशा विविध अंगांनी माहितीची नोंद केली जाणार आहे.ही सर्व माहिती एका प्रणालीद्वारे संकलित करण्यात येणार आहे.
यामुळे वृक्षतोड झाल्यास याची सर्व माहिती त्वरीत मिळणार आहे. त्याच बरोबर वृक्षगणनेमुळे हरित पट्टा किती प्रमाणात याची माहितीही ऑनलाईन राहणार आहे. त्यामुळे आगामी काळात आणखीन वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धन करण्यास मदत होणार आहे.

‘टॅगिंग’ द्वारे झाडांना कोड नंबर

वृक्षांना ‘जीआयएस टॅगिंग’ करून त्यांना कोड नंबर दिला जाणार आहे. त्यामुळे टॅगिंग केलेल्या  वृक्षांचे अक्षांश-रेखांश, ठिकाण आणि त्याचे अंतर समजण्यास सोपे जाणार आहे. यासाठी तांत्रिक सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याची कार्यवाही ही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती वनिकरण  विभागाकडून देण्यात आली.