आरोग्य विभागातील कंत्राटी भरती; परजिल्ह्यातील उमेदवारांसह नातेवाईकांची प्रचंड गर्दी
रत्नागिरी:- जिल्हा परिषद भवनात कोरोनाचे बाधित आढळून आल्यामुळे प्रशासनाने अनेक निर्बंध घातले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे बाधित सापडत असतानाच जिल्हा परिषद परिसरात आरोग्य विभागातील कंत्राटी भरतीसाठीच्या समुपदेशनाला परजिल्ह्यातील अनेक उमेदवार आणि त्यांच्या नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती.
जिल्ह्यात दरदिवशी दोनशे कोरोना बाधित सापडत आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शासनाने अनेक निर्बंध घातले आहेत. रात्रीची संचारबंदीही चालू केली आहे. रत्नागिरी शहरात त्याची कडक अंमलबजावणी केली जात असून रात्रीच्यावेळी एखादा दुचाकी चालक भेटला तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. जिल्हा परिषद इमारतीमधील कर्मचारी आणि अधिकारी कोरोना बाधित सापडल्याने एक दरवाजा बंद करत अभ्यागतांवर मर्यादा आणल्या आहेत. महत्वाचे काम असेल तरच त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात आहे. सर्वसामान्यांना नो एन्ट्रीचा फलक लावण्यात आला आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रशासन सतर्कता दाखवत आहे; मात्र सोमवारी (ता. 17) झालेल्या समुपदेशन प्रक्रियेला परजिल्ह्यातून आलेल्या शेकडो उमेदवारांसह त्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती.
जिल्हापरिषदेच्या उपकेंद्रात 378 जणांची समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. काही महिन्यांपुर्वी 110 जणांची नियुक्ती करण्यात आली होती. उर्वरित उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी सोमवारी समुपदेशन घेण्यात आले. ही समुपदेशन प्रक्रिया श्यामराव पेजे सभागृहात झाली. सकाळी 9 वाजल्यापासून सभागृहाबाहेर उमेदवार, त्यांचे नातेवाईक गर्दी करुन होते. यावेळी कोरोनाचे कुठल्याही नियमांचे पालन करण्यात आलेले नव्हते. ही प्रक्रिया दिवसभर चालू होती. या उमेदवारांना टप्प्या टप्प्याने बोलावण्यात आले असते तर कदाचित हा गोंधळ उडाला नसता अशी चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरु होती. समुपदेशनासाठी आलेल्या हे उमेदवार जिल्हा परिषद इमारतीमध्येही इकडेतिकडे फिरत होते. त्यामुळे तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.