जिल्ह्यात 90 टक्के जणांनी घेतला लसीचा पहिला डोस 

रत्नागिरी:-ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. 11 सप्टेंबरपर्यंत पहिल्या डोसचे 90.85 टक्के तर दुसऱ्या डोसचे 50.35 टक्के लसीकरण पूर्णत्वास गेल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.  

सध्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागल्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी अनेकांकडून आजही टाळाटाळ होत असल्याची बाब समोर येत आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभाग ‘विशेष मोहीम’ राबवण्याच्या तयारीत आहे. ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव झालेले बाधित भारतात सापडल्यानंतर आरोग्य विभागाकडून सतर्कता बाळगली जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर सप्टेंबर महिन्यापासून ओसरण्याच्या मार्गावर आहे. पण आगामी ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. गेल्या काही महिन्यात कोरोनावरील लसीकरणाला जिह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.     

राज्याच्या तुलनेत रत्नागिरी जिह्यातील लसीकरणाचा टक्का अधिक आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात 10 लाख 81 हजार एवढ्या लोकांनी लसीकरणाची पहिली मात्रा घेतली आहे. एकूण पात्र लोकांच्या तुलनेत 90.15 टक्के जणांनी पहिला डोस घेतला. दुसरा डोस घेणाऱयांचा टक्काही 48.54 होता. पण लसीकरणाच्या या गतीमान मोहिमेची वाटचाट उद्दिष्टपूर्तीकडे सुरू झालेली आहे.