चिपळूण:- आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका येत आहेत. त्यात महायुती म्हणून आपण एकत्र राहिले पाहिजे. महायुतीच्या वरिष्ठस्तरावरील सर्वच पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन संपूर्ण जिल्ह्यात हा महायुतीचा पॅटर्न राबवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले.
चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहरातील राधाताई लाड सभागृहात शनिवारी (ता. ४) झालेल्या महायुती नियोजन समिती व हितचिंतकांच्या आभार व सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी आमदार निकम म्हणाले, प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, संकल्प वेगळे असते. कारण निवडणुकीत समोरचा उमेदवारदेखील त्याच ताकदीने उतरत असतो. अशाही स्थितीत तुम्ही सर्व जणं ठाम राहून निवडणुकीत विकासकामांच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहचलात. त्यामुळेच हे यश मिळू शकले. निवडणुकीत मिळालेल्या कमी मताधिक्याचे हेवे-दावे करत बसण्यापेक्षा आपण आपलं काम करत ते लोकापर्यंत घेऊन गेले पाहिजे. चिपळूण शहराने २०१९ च्या निवडणुकीत ८ हजाराचे मताधिक्य दिले होत. त्याची जाणीव आपल्याला आहे. आताची परिस्थिती वेगळी होती, माझ्याबद्दल काही समज गैरसमज पसरवण्याचे काम झाले. अशाही स्थितीत चिपळूण शहराने जी साथ दिली त्यात मिळालेल्या विजयात या शहराचा वाटा महत्वाचा आहे. निवडणुका झाल्या आता अडीच वर्षानंतर मंत्रीपद मिळेल या सर्व जर तरच्या गोष्टी असतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे. विधानसभा निवडणूक पहिल्यापासूनच आव्हानात्मक होती. निवडणूक प्रचारादरम्यान आपली विकासकामे महायुतीचे सर्वच कार्यकर्ते मतदारांपर्यंत घेऊन गेले. त्यांच्या या मेहनतीमुळेच आव्हानात्मक असलेल्या या निवडणुकीत आपला विजय झाला आहे. माझ्या गावात कोट्यावधीची कामे करुन देखील मताधिक्य कमी झाले याची कारणे शोधली पाहिजे. सकारात्मक आहे ते पुढे घेऊन जाण्याची आपली भुमिका ठरवली पाहिजे.
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीतील रणनितीविषयी ते म्हणाले, महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल, त्यावेळची परिस्थिती कशी असेल हे कोणीच सांगू शकत नाही. आमदारकीच्यावेळी जसा महायुतीचा उमेदवार निवडूण आणलात त्या पध्दतीने कोणतीही कुजबुज न करता जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्याला निवडूण आणायाचा आपला प्रयत्न हवा. आपला स्पर्धक असला तरी त्याला नमस्कार करण्याची भुमिका ठेवली पाहिजे. निश्चितपणे यातून आपल्याला यश मिळेल. जेवढी प्रामाणिकपणाने कामे करता आली तेवढी केली. यापुढेही ती करत राहणार, चिपळूण शहर पूरमुक्त, तलाव, ग्रॅव्हीटी योजना, पर्यटन, कला-क्रीडा, पाझर तलाव, पाणी योजना यासारखी कामे मतदार संघात करायची आहेत. त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, त्याची ग्वाही देतो असे त्यांनी सांगितले.
या मेळाव्याला माजी आमदार विनय नातू, राष्ट्रावादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, नितिन ठसाळे, संदेश आयरे, उमेश सकपाळ, विजय चितळे, रामदास राणे, पूजा निकम, दिशा दाभोळकर, सुरेखा खेराडे, किशोर रेडीजे, जयंद्रथ खताते, अशोक कदम, किशोर रेडीज, राम शिंदे, सुरेश खापले, साधना बोत्रे, आदीती देशपांडे, मिलिंद कापडी उपस्थित होते.