रत्नागिरी:- राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमातंर्गत 10 ते 22 मार्च या कालावधीत जिल्ह्यातील अतिजोखमिच्या भागामध्ये सक्रिय क्षयरोग शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे नियोजन केले असून, सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
या मोहिमेअंतर्गत संशयीत क्षयरुग्णांचे थुंकीचे नमुने व क्ष-किरण तपासणी मोफत करुन निदान निश्चिती नंतर त्यांच्यावर मोफत औषोधोपचार सुरु करणे हे मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला, ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त येणे, मानेवरील गाठ अशा लक्षणांबाबत विचारणा करण्यात येणार आहे. यापैकी लक्षणे आढळल्यास तो संशयीत क्षयरुग्ण म्हणून ओळखला जाईल व त्याचे दोन थुंकी नमुने घेऊन व एक्सरे करिता संदर्भित करुन तपासणी अंती निदान निश्चिती करण्यात येणार आहे,अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.महेंद्र गावडे यांनी दिली आहे.
नागरिकांनी घरी येणार्या आरोग्य कर्मचारर्यांना सहकार्य करून आवश्यक योग्य ती माहिती देऊन क्षयरोग शोध मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे.