१ हजार १६६ कर्जदार; अनधिकृत सावकारी कर्ज ८० कोटीच्यावर
रत्नागिरी:- जिल्ह्यात सावकारीचा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. नोंदणीकृत सावकारांनी जिल्ह्यातील १ हजार १६६ कर्जदारांना १२ कोटी ३८ लाख २८ हजार ५०० एवढे कर्जवाटप केल्याची आकडेवारी जिल्हा उपनिबंधकांनी जाहीर केली आहे. ६८ सावकारांकडून हे कर्ज वाटप झाले आहे; मात्र बेकायदेशीर सावकारी आणि रजिस्टरवर नोंदणी नसलेल्या कर्जाचा विचार केला तर सुमारे ७० ते ८० कोटींच्यावर सावकारी कर्जाची उलढाल असल्याचे समजते.
रत्नागिरी शहरात काही दिवसांपूर्वीच उघडकीस आलेल्या सावकारी प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली तसेच१ लाख रुपये सावकारी कर्ज घेतलेल्या व्यक्तीचे ४० लाख रुपये कर्ज झाले. या प्रकरणात पोलिसांनी वैभव सावंत याला अटक केली. त्याच्याकडे काही जणांनी कर्जाची नोटरी केल्याचे उघड झाले आहे. पोलिस या प्रकरणांचा तपास करत आहे. या घटनेने सावकारी व कर्ज हे दोन शब्द चर्चेत्त येऊ लागले आहेत. त्यामुळे एकूणच या व्यवस्थेवर पोलिसांचे देखील बारकाईने लक्ष आहे. शिवाय सावकारी कर्ज देऊन सामान्यांची पिळवणूक करणाऱ्यांवर पोलिस, प्रशासनाचे लक्ष आहे. त्यानंतर आणखी दोन बेकायदेशीर सावकारांवर गुन्हा दाखल झाला आहे. किरकोळ रक्कमेवर अव्वाच्यासव्वा व्याज आकारून सामान्यांची पिळवणूक सुरू आहे. एकाचा पासपोर्ट तर दुसऱ्याच्या सावकारांनी गाड्या ओढून आणल्या. त्यामुळे सावकारांची सामान्यांवर चांगलीच दहशत आहे. २०१९ नंतर २०२१ मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र झाल्याने अनेकांचे आर्थिक स्रोत कायमचे बंद झाले. काहींनी नोकरी गमावली, नवीन नोकरीच्या शोधात वेळ घालवण्यापेक्षा काहींनी व्यवसायाचा हात धरला. आधीच विस्कटलेली आर्थिक घडी व त्यात बँकाचे कर्ज थकल्याने अनेकाची पावले ही सावकारीकडे वळली. काहीजण आर्थिक समस्यांचे निराकरण, बदलत्या जीवनशैलीमुळे वाढलेले खर्च भागवण्यासाठी तर काहींनी व्यवसाय, हौस, उसने पैसे फेडण्यासाठी यासारख्या अनेक कारणांसाठी कर्जाची उचल केली.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात परवानाधारक असलेले ६८ सावकार आहेत. यातील रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक ५४ सावकार आहेत. त्या खालोखाल चिपळूण ११, खेड २ आणि संगमेश्वर १चा क्रमांक लागतो. कर्जदारांची संख्या १ हजार १६६ असून, कर्जाची रक्कम कोटीच्या घरात आहे. विशेष म्हणजे रत्नागिरी तालुक्यात असलेल्या एका सावराकाराकडे सर्वाधिक ५४० कर्जदार आहेत व त्यांच्याकडील कर्जाची रक्कम ७ कोटी १२ लाख ३८ हजार इतकी आहे. एकूण १३ सावकारांकडे कर्जदार संख्या आणि रक्कम शून्यावर आहे. बेकायदेशीर सावकारीलाही पेव आले आहे. याची कोणतीही नोंद उपनिबंधकाकडे नाही. सर्वसामान्यांनी त्यांच्याकडून कर्जउचल केली आहे. नोंदणीकृत सावकारीमध्ये रजिस्टरवर नोंदवलेली वेगळी आणि नोंदवली नसलेल्या वेगळ्या कर्जांचा समावेश आहे.