जिल्ह्याच्या पर्यटनाला नव्याने झळाळी; पर्यटकांची पाऊले किनाऱ्यांकडे

रत्नागिरी:- कोरोनामुळे गेली दोन वर्ष ठप्प झालेल्या पर्यटन व्यवसायाला आता गती मिळू लागली आहे. पर्यटकांची पावले जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यांकडे वळू लागली आहेत. मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक पर्यटक कुटुंबियांसह ‘विक एंड’ला जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मेटाकुटीला आलेले हॉटेल व्यावसायिकही आता पर्यटकांच्या स्वागताला सरसावले आहेत. मात्र जिल्ह्यात अद्याप वॉटर स्पोर्टस सुरु न झाल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे.

कोरोनामुळे देशभर 22 मार्च 2020 पासून लॉकडाऊन सुरु झाले. वर्ष उलटून गेले तरी कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेमुळे लॉकडाऊन हटण्याचे नाव घेत नव्हते. गेल्या दोन,तीन महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या घटल्यानंतर शासनाने हळूहळू विविध व्यावसायिकांना शिथिलता देण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून निर्बंध हटवल्याने व रुग्ण संख्याही घटल्याने आता पर्यटन व्यवसायालाही गती येऊ लागली आहे.
कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला होता. किनारपट्टीवरील व्यवसाय डबघाईला आले. कोरोनामुळे पर्यटकांनी पाठ फिरवल्याने दापोलीत कर्धे, मुरुड, गुहागर, वेळणेश्वर, गणपतीपुळे, आरेवारे, भाट्ये येथील समुद्र किनार्‍यांवर पूर्णत: शुकशुकाट पसरला होता. ज्या हॉटेल व्यावसायिकांनी बँकांचे कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केले, तो व्यावसायिक कर्जबाजारी होऊन आर्थिक खाईत सापडला होता.

गणपतीपासून कोरोनाचे नियम शिथिल झाल्याने आता पर्यटन व्यवसाय सुरू झाला आहे.त्यामुळे गेली दीड वर्ष घरामध्ये बसून राहिलेल्या नागरिकांनी गणेश उत्सवानंतर पर्यटनाकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्युळे जिल्ह्यात पर्यटकांचा राबता वाढला आहे. शनिवार व रविवार धरुन बर्‍यापैकी पर्यटक जिल्ह्यात येऊ लागले आहेत. बुकींग विषयी हॉटेल, रिसॉर्टमध्ये आता चौकशी होऊ लागली आहे.

स्थानिकांसह जिल्हाबाहेरील पर्यटकही आता किनार्‍यावर मोकळ्या हवेत फिरण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. जिल्ह्यात दापोली, गुहागर समुद्रकिनारा, गणपतीपुळे, मालगुंड समुद्रकिनार्‍यावर वॉटर स्पोर्टस्, पॅरासेलिंग, जेट्स स्की, बनाना रायडिंग, बोटिंग यासह रत्नागिरी स्कुबा डायव्हिंगची व्यवस्था आहे. मात्र अद्याप वॉटल स्पोटर्सला जिल्ह्यात सुरुवात झालेली नाही. 15 ऑक्टोबरनंतर ही सुरुवात होण्याची शक्यता व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी गणपतीपुळे येथे बोटींग क्लबचा शुभारंभ स्थानिक आमदार व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला होता. मात्र पर्यटकांसाठी ते अद्याप खुले झालेले नाही.
रत्नागिरी शहरात असलेले मत्स्यालय, लोकमान्य टिळक जन्मस्थान, थिबापॅलेस, थिबापॉईंट हे पर्यटक पॉईंट असले तरी ते सध्या बंद असल्याने, आलेल्या पर्यटकांकडून पहायचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यभर मंदिर बंद असल्याने पर्यटक सध्या गणपतीपुळे येथे सीसीटीव्हीद्वारे दर्शन करुन किनार्‍यावर फिरण्याचाच आस्वाद घेत आहेत. जिल्ह्यातील प्रमुख किनार्‍यांवर गर्दी होत आहे.  मात्र किनार्‍या व्यतिरिक्त काहीही पहायला नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे.