डॉ. संघमित्रा फुलेंची तत्परता; रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय दूर
रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालयात अडचणी काही कमी होत नाहीत. एका पाटोपाठ एक संकट येत असले तरी त्यातून मार्ग निघत आहे. प्रसूती विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रश्न सुटला असताना सेन्सर खराब झाल्यामुळे रुग्णालयाची लिफ्ट काल बंद पडली. परंतु जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी तत्परता दाखवत रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले.
त्याची दखल घेऊन २४ तासात बंद पडलेली लिफ्ट सुरू केली. डॉ. फुले यांच्या कार्यतत्परतेचे रुग्णांच्या
नातेवाईकांकडुन कौतुक होत आहे.
जिल्हा रुग्णालयातील विविध अडचणीमुळे रुग्णालय नेहमी चर्चेत असते. प्रसूती विभागातील वैद्यकीय
अधिकाऱ्यांचा प्रश्न सुटला असताना काल रुग्णांसाठी असलेल्या लिफ्ट अचानक बंद पडली. त्यामुळे गंभीर
रुग्णांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावरील वॉर्डमध्ये नेण्यासाठी काहीसी गैरसोय झाली. परंतु इमारतीला रॅम्प असल्याने रुग्णांना स्ट्रेचरवरून ने आण करण्याची व्यवस्था होती. परंतु ही गैरसोय तत्काळ दूर व्हावी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक सौ. संघमित्रा फुले यांनी कामात तत्परता दाखवली. तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे बंद लिफ्ट तत्काळ दुरुस्त करण्याबाबत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले.
शल्य चिकित्सकांच्या पत्रानंतर सार्वजनिक बांधकामच्या इलेक्ट्रीक विभागाने पाहणी केली. तेव्हा इमारतीच्या दुरूस्तीचे काम सुरू असताना लिफ्टचा सेन्सर नादुरुस्त झाला. त्यामुळे लिफ्ट बंद पडल्याचे पुढे आले. त्याची तत्काळ दुरूस्ती करून २४ तासात बंद पडलेली लिफ्ट सुरू झाली. रुग्णांची गैरसोय दुर करण्यासाठी डॉ. फुले यांनी दाखविलेल्या तत्परतेबाबत रुग्ण आणि नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.