जिल्हा रुग्णालयाच्या डागडुजीसाठी दहा कोटींचा निधी: ना. रवींद्र चव्हाण 

रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. ही दुरुस्ती तातडीने करण्याची आवश्यकता आहे. या दुरुस्तीसाठी प्राथमिक टप्प्यात १० कोटी निधी तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत. यासंदर्भात येथील लोकप्रतिनिधी तसेच मंत्री व आमदार उदय सामंत यांच्याशी चर्चा करण्यात येईल असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी शनिवारी रत्नागिरी सिव्हील हॉस्पीटल येथे भेट दिली. दोन मजली व सुमारे २२५ खाटांची क्षमता असलेल्या या हॉस्पीटलमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची गळती मोठया प्रमाणावर आहे. तसेच हॉस्पिटलची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. चव्हाण यांनी या रुग्णालयाच्या भेटीनंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले की, रत्नागिरी मधील हे प्रमुख शासकीय रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयातील डॉक्टर्स हे चांगल्या पध्दतीने येथील रुग्णांना सेवा देत असून सर्व डॉक्टर्स आणि त्यांची मेहनत आपण कोविडच्या काळात प्रत्यक्ष डोळयाने पाहिलेली आहे. त्यामुळे त्यांनी चांगल्या वातावरणामध्ये आरोग्य सेवा करणे हे देखील फार महत्वाचे आहे, त्यामुळे आवश्यक सर्व सुखसोयी या ठिकाणी उपलब्ध असणे गरजेचे आहे असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे यामध्ये आपण स्वत: आणि स्थानिक आमदार व मंत्री उदय सामंत यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी सर्व जण मिळून यामध्ये अजून कशी सुधारणा होईल याकरिता प्रयत्न करुन असेही प्रतिपादन केले. या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी अत्यावश्यक आहेत त्या गोष्टी प्रामाणिकपणे करण्याचा आपला प्रत्यन आहे आणि ज्या जनतेच्या हिताच्या आहेत त्याला प्राधान्य देण्याच काम हे येणाऱ्या काळामध्ये आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आमचे सर्वांचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हेच सांगितलेलं आहे की, जे काम जनतेच्या हिताचे आहे ते प्राधान्याने करा.

या सर्व व्यवस्था सुधारणांच्या संदर्भात स्थानिक संबंधित अधिकारी यांना कशा सुधारणा करायचला पाहिजेत याबद्दल सूचना संबंधितांना दिलेल्या असून हा सर्व विषय तिथे असणा-या हॉस्पीटल स्टाफ व सा.बां.विभागाचे अधिकारी या सर्वांनी मिळून एक ॲक्शन प्लॅन (कृती आराखडा) तयार करायला सांगितले असून त्या प्लॅन नुसार बजेटमध्ये कराव्याच्या तरतूदि संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. तसेच, या संपूर्ण व्यवस्थेच्या सुधारणा करण्याकरिता संबंधित ज्या ज्या विभागांशी फॉलोअप (समन्वय) आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत असेही श्री. चव्हाण यांनी आश्वासित केले. तसेच, माझ्या खात्याशी संबंधित असलेल्या सर्व मंजूरी आपण प्रदान करीत असल्याचेही श्री. चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

परंतू, मुख्य इमारती व इमारत परिसरातील देखभाल दुरुस्ती होणे हे अतिशय महत्वाचे आहे. त्या अनुषंगाने येथील स्थानिक लोकप्रतिनिधी मंत्री व आमदार उदय सामंत आदींशी चर्चा करुन ध्यानात आले की, या सिव्हील हॉस्पीटलची दुरुस्ती करणे अतिशय गरजेचे आहे. दुरुस्तीची बाब ही खर्चीक असल्यामुळे या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब ध्यानात आली आहे. परंतू, रत्नागिरी परिसरातील नागरिकांसाठी हे रुग्णालय अतिशय महत्वाचे असल्याने सदर रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी पहिल्या टप्प्यात साधारणपणे १० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात १० कोटीचा खर्च करुन हॉस्पीटलची दुरुस्ती तातडीने होत असेल तर त्या दृष्टीने येथील सर्व संबंधित मंडळाशी चर्चा करुन या गोष्टी तातडीने कशा काय पूर्ण करता येतील या बाबत निर्णय घेण्यात येईल.आवश्यकता भासल्यास सीएसआरच्या माध्यमातून तातडीने फंड उभारण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

एसटी स्टँडची उभारणीही प्राधान्याने करणार रत्नागिरी येथे एसटी महामंडळाचे स्टॅण्ड काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे,या एसटी स्टँडच्या जागेला भेट दिली व त्याची पाहणी आज रविंद्र चव्हाण यांनी केली. त्यासाठी आम्ही मिळून प्रयत्न करु, तसेच अशा अनेक गोष्टी आम्ही प्रायोरिटी बेसिसवरती करु असे देखील श्री. चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले.