जिल्हा मराठी भाषा समिती गठीत; समितीच्या अशासकीय सदस्य पदावर नमिता कीर यांची नियुक्ती

रत्नागिरी:- राज्य शासनाच्या मराठी भाषेत शासकीय कामकाज करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर मराठी भाषा समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या समितीमध्ये अशासकीय सदस्य पदावर कोमसापच्या कार्याध्यक्ष नमिता कीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

शासनाने 16 जुलै 2021 च्या महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) अधिनियमान्वये जनतेशी करण्यात येणारा सर्व पत्रव्यवहार व इतर कार्यालयीन कामकाज मराठी भाषेत करणे अनिवार्य केले आहे.  यानुसार ही समिती आहे. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. यात पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.  नियुक्त करण्यात आलेले मराठी भाषा अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव असतील. 

समितीमध्ये नामनिर्देशित अशासकीय सदस्यांमध्ये कोमसापच्या कार्याध्यक्ष नमिता कीर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख शिवराज गोपाळे,  लोकमान्य टिळक स्मारक मंदिर चिपळूणचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे आणि केशवसूत स्मारक समिती, ( मालगुंड) चे अध्यक्ष गजानन पाटील यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.