जिल्हा बँक निवडणुकीसाठी गुरुवारी 13 उमेदवारी अर्ज 

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीसाठी गुरुवारी (ता. 21) दिवसभरात तेरा जणांनी अर्ज दाखल केले. मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज शुक्रवारी (ता. 22) अंतिम मुदत आहे.

ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी सर्वपक्षीय पॅनलची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादी, भाजपमधून अनेक इच्छुकांनी डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. या घडामोडी घडत असताना नागरी बँक व सहकारी पतसंस्था मतदार संघातून अ‍ॅड. सुजित झिमण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरताना चिपळूण राष्ट्रवादी कॉग्रेसचे जयद्रथ खताते, कॉग्रेसचे लांजा तालुकाध्यक्ष शांताराम गाडे, भाजपाचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश शेवडे, चंद्रकांत परवडी, विवेक सावंत, सी. ए. जाधव आदी उपस्थित होते.

गुरुवारी दिवसभरात तेरा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात संजय आयरे (लांजा), चंद्रकांत बाईत (गुहागर), सुरेश साळुंंखे (लांजा), राजेंद्र सुर्वे (संगमेश्‍वर), महादेव सप्रे (राजापूर), कुक्कुटपालनमधून सचिन बाईत, दुग्धमधून अजित यशवंतराव, औद्योगिम वाहतूकमधून हरेश्वर कालेकर, नागरी पतसंस्थेमधून सुजित झिमण, मजूर संस्थेतून राकेश जाधव, स्नेहल सचिन बाईत, नेहाली लिलाधर नागवेकर (महिला राखीव) तर गृहनिर्माणमधून सहकार पॅनेलचे अ‍ॅड. दिपक पटवर्धन यांनी अर्ज दाखल केले आहेत.