जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजस्तंभ उभारणाऱ्या क्रेन चालकाने नाकारले पाच लाख भाडे

रत्नागिरी:- तब्बल दोन वर्षांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजस्तंभ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी महाकाय क्रेन जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली असून या क्रेन मालक सच्चा देशभक्त निघाला आहे. ध्वजस्तंभ उभारण्यासाठी लावणारे पाच लाख भाडे या क्रेन मालकाने नाकारले असून त्याच्या या देशभक्तीचे कौतुक होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात १०० फुट ध्वज स्तंभ मोठ्या दिमाखात उभारण्यात आला होता. हा ध्वज स्तंभ म्हणजे रत्नागिरीकरांसाठी गौरव होता. मात्र मागील सुमारे २ वर्षापासून या ध्वज स्तंभावर ध्वज फडकवला न गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. सोसाट्याच्या वाऱ्याने या ध्वज स्तंभावरील ध्वज फार काळ टिकत नाही व या ध्वज स्तंभावरील केबल देखील तुटल्याने नवीन ध्वज फडकावण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. या कामासाठी अवाढव्य क्रेनची आवश्यकता होती. जिल्हा प्रशासनाने चौकशी करता अशी क्रेन मुंबई गोवा महामार्गावरून जाणार असल्याचे कळले. या क्रेन मालकाशी संपर्क साधला असता त्याने रत्नागिरीत येण्याची तयारी दाखवली. या क्रेनचे ८ तासांचे भाडे तब्बल ५ लाख रुपये इतके आहे. मात्र तिरंग्याच्या आणि देशाच्या प्रेमापोटी हे भाडे या क्रेनच्या मालकाने नाकारल्याची माहिती मिळत आहे.

शुक्रवारी सकाळी हि क्रेन रत्नागिरीत दाखल झाली असून कामाला सुरुवात देखील करण्यात आली आहे. या कामासाठी जयस्तंभ येथे एकेरी वाहतूक करण्यात आली असून सुमारे दोन तास हे काम चालेल अशी माहिती मिळत आहे. देशाच्या प्रेमापोटी तब्बल ५ लाख रुपये भाडे नाकारणाऱ्या क्रेन चालकाचे मात्र कौतुक होत आहे.