चिपळूणात रिक्षा-स्विफ्ट अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू; तिघेजण जखमी

चिपळूण:- चिपळूण-कराड मार्गावरील पिंपळीखुर्द येथे रिक्षा व स्विफ्ट गाडीमध्ये झालेल्या अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून तर रिक्षातील तिघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेची येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गणेश चिले असे मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा चालक गणेश चिले आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन चिपळूण ते शिरगाव असा चालला होता. पिंपळी खुर्द येथे आला असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट गाडीने रिक्षाला जोरदार धडक दिली हा अपघात इतका गंभीर होता की, रिक्षाचालक गणेश जयराम चिले यांचा मृत्यू झाला असून रिक्षातील संदेश शिंदे, प्रज्ञा प्रकाश पालांडे, सानवी शिंदे असे तिघेजण जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, उपनिरीक्षक पांडुरंग चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र देसाई यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तर जखमींना चिपळुणातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या अपघाताची येथील पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.