रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. धोकादायक ठरणाऱ्या कशेडी घाटातील प्रवास आता करावा लागणार नाही. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी बोगद्याची एक लेन आजपासून म्हणजेच सोमवारपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.
रविवारी या बोगदा मार्गाची ट्रायल रन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील या एकमेव बोगद्यामुळे २५ मिनिटांचे अंतर अवघ्या १९ मिनिटांत पार करता येणार आहे. विशेष बाब म्हणजे यामुळे प्रवाशांचा जवळपास ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे. शिवाय कशेडी घाटातील अवघड, धोकादायक प्रवास आणि वाहतूक कोंडी टाळता येणार आहे.
मात्र, हा बोगदा सध्या गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरूपात खुला केला जाईल. आणि या काळात अवजड वाहनांना प्रवेश नसेल केवळ हलकी वाहने या बोगद्यातून प्रवास करू शकतील. कशेडी घाट सुरू झाल्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
कशेडी घाट रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्हयांना जोडणारा अवघड वळणांचा मार्ग आहे. रस्ता रूंद असला तरी तीव्र उतारांमुळे घाटाचा मार्ग पार करताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. या मार्गावरून लहान मोठ्या सर्वच प्रकारच्या वाहनांची मोठी वर्दळ असते.
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाट तब्बल २० किलोमीटर लांबीचा घाट आहे. तळकोकणात जाणारे प्रवासी याच मार्गाचा अवलंब करतात. कशेडी बोगदा वाहतुकीसाठी सुरु झाल्यामुळे प्रवाशांची कसरत वाचणार आहे. धोकादायक वळणं असलेल्या या घाटातून पावसाळ्यात प्रवास करणं खूप धोकादायक असतं. कशेडी घाटाला पर्याय म्हणून नवा बोगदा तयार केला जात आहे.