घराचे बांधकाम करताना पडल्याने कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा-सनगरेवाडी येथे घराचे बांधकाम करताना 7 फूट उंचावरून पडून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला.

भालचंद्र गुणाजी नागले (55, रा. चरवेली, रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या कामगारचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा शैलेंद्र भालचंद्र नागले (26) याने ग्रामीण पोलिसांकडे खबर दिली. त्यानुसार, गुरुवारी भालचंद्र नागले हातखंबा येथे घराचे बांधकाम करत होते. तेव्हा उंचावरून खाली पडल्याने त्यांचे डोके चिऱ्यावर आदळल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.