गुंगीचे औषध देऊन महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले

राजापूर:- रत्नागिरीत दोन रिक्षा चालकांचा लाडूतून गुंगीचे औषध देऊन लुटल्याची घटना ताजी असतानाच राजापुरात देखील अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. राजापूर तालुक्यातील तळगाव काजरेकरवाडी येथे एका महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटून चोरट्यांनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 राजापुरात गुरुवारी दुपारी रस्त्याने जाणाऱ्या तिघांनी महिलेकडे पिण्यासाठी पाणी मागितले, त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश केला. ते तिघेही हिंदी भाषेत बोलत होते. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी महिलेला गुंगीचे औषध दिले आणि तिच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र तसेच मोबाईल लांबवून फरार झाले.

 या प्रकाराची माहिती मिळताच  पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून तीन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.