दापोली:- दापोली तालुक्यातील कोळथरे येथे तरुणाने एका वृद्धाच्या घरात चोरी केली. मात्र वृद्धाने रंगेहाथ पकडल्याने वृद्धालाच मारहाण करून फरार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशांत राजेंद्र गुरव (23, कोळथरे, गुरववाडी, दापोली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद रघुनाथ परशुराम गोमरकर (79, दापोली) यांनी पोलिस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुनाथ गोमरकर हे 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास शेजारच्या घरात गप्पा मारण्यासाठी घराला कुलूप लावून गेले होते. यावेळी निशांत गुरव याने घराची कौले काढून पोटमाळ्यावरून घरात प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटातील 5000 हजाराची रक्कम चोरून फरार होत असताना रघुनाथ हे रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घरी आले. पोटमाळ्यावर कोणीतरी असल्याचा त्यांना संशय आला. त्यांनी जाऊन पाहिले तर संशयित निशांत हा पाळण्याच्या तयारीत होता. यावेळी त्यांनी पकडले. चोरिविषयी विचारणा केली असता रघुनाथ गोमरकर याना मारहाण करून निशांत हा फरार झाला. रघुनाथ यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी निशांत याच्यावर भादविकलम 394, 457, 380 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली.