रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी गावाकडे दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर साथींच्या आजारांना प्रतिबंध होण्यासाठी जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाने या चाकरमान्यांवर वॉच ठेवत त्यांची काळजी घेतली आहे. यावर्षी 588 चाकरमानी आजारी सापडले होते. या सर्वांवर उपचार करुन त्यांना सुखरुप मुंबईत पाठवण्यात आले. तब्बल 15 दिवस 24 तास 22 ठिकाणी आरोग्य कर्मचार्यांनी ड्युटी बजावली होती.
गणेशोत्सवासाठी गावी येणार्या चाकरमान्यांच्या दिमतीला मुंबई-गोवा महामार्ग असेल व अन्य महामार्गावर जिल्हा आरोग्य विभागाने आरोग्य तपासणी केंद्र उभी केली होती. जिल्ह्यात 5 सप्टेंबरपासून 19 सप्टेंबरपर्यंत ही पथके तैनात करण्यात आली होती. जिल्ह्यातील बसस्थानक, रेल्वेस्थानक व महामार्गावर वैद्यकीय तपासणी व माहिती केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. त्याद्वारे चाकरमान्यांची आरोग्य तपासणी व त्यांना प्रतिबंधात्मक उपचार तसेच खबरदारीविषयक मार्गदर्शन केले गेले. त्याठिकाणी कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्यांमार्फत चाकरमान्यांच्या वाहनांची चौकशी करुन त्यांच्या आजारासंबंधी विचारपूस केली जात होती.
सध्या पाऊस सुरू झाला आहे. तर काहीवेळा ऊन – पावसाचा खेळ असल्याने वातावरणात बदल झाला आहे. याचा फटका आरोग्यावर होत असून सध्या जिल्ह्यात सर्दी, ताप, डेंग्यू, मलेरिया याची साथ आली आहे. साथीच्या पार्श्वभूमीवर येणार्या चाकरमान्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न केले.
जिल्ह्यात 22 ठिकाणी आरोग्य पथके तैनात करण्यात आली होती. आतापर्यंत 10 हजारांपेक्षा जास्त चाकरमान्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 588 चाकरमानी आजारी असल्याचे दिसून आले. यामध्ये 379 चाकरमानी ताप, सर्दी , खोकला याने आजारी होते. तर 208 चाकरमानी इतर आजराने आजारी होती. या सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. या सर्वांना सुखरुपपणे मुंबईकडे रवानाही करण्यात आरोग्य विभागाला यश आले. 24 तास महामार्गावर तसेच अन्य ठिकाणी आरोग्य विभागाचा जागता पहारा होता.