रत्नागिरी:- लोकसभा निवडणूक आणि वाढते तापमान यामुळे कोकणातील समुद्र किनार्यांना पर्यटकांची प्रतिक्षाच होती. मात्र विनायकी चतुर्थीला जोडून शनिवार, रविवारी सुट्ट्या आल्यामुळे प्रसिध्द गणपतीपुळे पर्यटनस्थळा प्रथमच पर्यटकांनी गजबजले. सलग दोन दिवस सुमारे वीस हजार पर्यटकांनी दररोज हजेरी लावली. यामध्ये सर्वाधिक पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील पर्यटक वर्गाचा समावेश होता. यंदा हंगामातील पहिलीच गर्दी झाल्यामुळे गणपतीपुळ्यातील व्यावसायीक सुखावले आहेत.
महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावरील निवडणुका तिन टप्प्यात विभागल्या गेल्या आहेत. त्याचा परिणाम पर्यटनावर झाला असून कोकणातील पर्यटकस्थळांवर गर्दीचा लवलेश नव्हता. दरवर्षी 7 मे नंतर कोकणातील किनारे पर्यटकांनी फुलून जातात. मात्र ही गर्दी कुठेच नव्हती. 7 मे रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील मतदान झाल्यानंतर पर्यटकांची पावले समुद्रकिनार्यांकडे वळू लागली आहेत. शनिवारी विनायकी चतुर्थी होती. त्यानंतर जोडून रविवार आल्यामुळे पर्यटकांनी गणपतीपुळेला प्राधान्य दिले होते. कोल्हापूर, सातारा, सांगली या परिसरातील बहूसंख्य पर्यटक गणपतीपुळेत दाखल झाले होते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेल्या भागातील अनेक गाड्या आलेल्या असल्याचे गणपतीपुळेतील व्यावसायीकांनी सांगितले. मुंबई, पुण्यातील निवडणूक पुढील आठवड्यात पूर्ण होणार असल्याने तेथील पर्यटक पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे. फिरायला बाहेर पडणारा सरकारी कर्मचारी वर्ग निवडणूक कामात व्यस्त असल्यामुळे पर्यटनावर परिणाम झाला आहे.
गणपतीपुळेमध्ये शनिवारी (ता. 11) दिवसभरात सुमारे 20 हजार पर्यटकांनी हजेरी लावल्याचे मंदिर प्रशासनकाडून सांगण्यात आले. रविवारीही तेवढीच गर्दी होती. त्याचा फायदा किनार्यावरील फेरीवाल्यांना झाला. पर्यटक फेरीबोटी, जेटस्की, बलूनद्वारे समुद्र सफर करताना दिसत होते. उंट, घोडे सवारीत अनेक जणं व्यस्त होते. तर फोटो सेशन करणार्यांचीही कमी नव्हती. दिवाळी, ख्रिसमसनंतर प्रथमच एवढी गर्दी गणपतीपुळे पहायला मिळाली. हॉटेलबरोबरल निवासही फुल्ल होती. दोन दिवसांमध्ये एक कोटीच्या घरात उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
दरम्यान, यंदा हंगाम 10 जुनपर्यंत राहिल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 15 जूनला नवीन शैक्षणिक सत्र सुुरू होत आहे. दहावी, बारावीच्या परिक्षा वगळता निवडणूक निकाल 4 जुनला जाहीर होणार आहे. त्यानंतर पहिल्या आठवड्यात पर्यटकांची संख्या किनारी भागात राहिल.