गणपतीपुळेत 18 हजार पर्यटकांनी हजेरी; सलग सुट्ट्याचा फायदा
रत्नागिरी:- ख्रिसमस आणि नवीन वर्ष स्वागतासाठी कोंकणातील पर्यटन ठिकाणी फिरणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. गणपतीपुळे मध्ये सुमारे अठरा हजार पर्यटकांनी हजेरी लावली असून सलग सुट्ट्यामुळे त्यात वाढच होणार आहे. हर्णे, दापोलीतही पर्यटकांचा राबता वाढल्याने व्यवसायिक समाधानी आहेत.
नोव्हेंबर महिन्यात रत्नागिरी तालुक्यातील प्रसिध्द गणपतीपुळे मंदिर व किनारा, मत्स्यालय, पावस याठिकाणी पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातून मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागली. दिवाळी, ख्रिसमस, उन्हाळा हे हंगाम पर्यटन स्थळी गर्दीचे होते. त्यात शालेय सहलिंची भर होती. किनार्यावरही प्रचंड गर्दी वाढल्यामुळे पर्यटनस्थळांवरील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या आर्थिक उलाढालीत वाढ झाली आहे.
यंदाही पर्यटन स्थलांवर मोठी गर्दी होऊ लागली आहे. सद्या कोंकणात थंडीही वाढली असून पर्यटनाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे येथे 21 ते 29 या कालावधीत साधारणपणे आठ ते नऊ हजार पर्यटक हजेरी लावून जात होते. शनिवारी, रविवारी सलग दोन दिवस शासकीय सुट्ट्या आल्यामुळे पर्यटकांना संधी मिळाली आहे. अनेकांनी पंधरा दिवस आधी पासूनच हॉटेल निवास आरक्षित करून ठेवले होते. शनिवारी (ता. 28) दिवसभरात अठरा हजार पर्यटकांनी हजेरी लावली. याला गणपतीपुळे देवस्थान कडून दुजोरा मिळाला आहे. अनेक पर्यटक निवासासाठी आल्याने लॉजिंग वाल्यांना अच्छे दीन आले आहेत. किनाऱ्यावरील फेरीवाले, छोटे-मोठे व्यवसायिक यांचा व्यवसाय चांगला सुरु झाला आहे. ही गर्दी 1 जानेवारी पर्यंत राहील असा अंदाज आहे. गणपतीपुळे प्रमाणे हर्णे, दापोली परिसरातील किनारी भागातलाही पर्यटकांनी पसंती दिली आहे. या भागात बारा हजार पर्यटक हजेरी लावून गेल्याचा अंदाज आहे. या ठिकाणी पुणे, नाशिक भागातील लोकांचा अधिकारी राबता आहे. तर गणपतीपुळेत महाराष्ट्रच्या कानकोपऱ्यातून पर्यटक आलेले आहेत.