खेड:- खेड रेल्वे स्टेशन समोरील समर्थ कृपा विश्वस्नेहा अपार्टमेंटजवळ लावलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर दुचाकी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली. ही घटना ११ सप्टेंबर रात्रौ ८ ते १२ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान घडली. या चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
या घटनेबाबत मोटार सायकलचे मालक श्री . विठोबा विष्णु घाणेकर ( ५७ वर्षे, रा. समर्थ कृपा विश्वस्नेहा अपार्टमेंट, वेरळ , ता.खेड, जि. रत्नागिरी) यांनी १३ सप्टेंबर रोजी खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञतावर भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान पोलीस अधीक्षक डॉ . मोहित कुमार गर्ग यांचे मार्गदर्शनाखाली १३ रोजी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे सपोफौ. प्रशांत बोरकर, संजय कांबळे, पोहेकॉ. अरुण चाळके, बाळु पालकर, सागर साळवी, पो.ना. योगेश नार्वेकर, सत्यजीत दरेकर, दत्तात्रय कांबळे हे गस्त घालत असताना सायंकाळी सुमारे ५.०० वा. सुमारास आवाशी गावाजवळ एक मोटार सायकलस्वार संशयीतरित्या फिरताना दिसुन आला. त्याचेकडे केलेल्या चौकशीत त्याचे नाव जय उर्फ सोन्या शिवाजी चव्हाण (२५ वर्षे, रा. चोचींदे स्टॉप जवळ, ता. महाड, जि. रायगड) असे त्याने सांगितले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याचेजवळ असलेली हिरोहोंडा मोटार सायकल क्र. एम.एच. ०८/ एन/ २७३४ ही त्याने चोरली असल्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या कबुली बाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने खेड पोलीस ठाणे येथे चौकशी केली असता ही मोटार सायकल खेड मधून चोरीची असल्याचे समजले. त्यानंतर सदर आरोपीला अटक करून पुढील तपासासाठी खेड पोलीस स्थानकात आणण्यात आले.
या आरोपीला १४ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता त्यास त्याची जामिनावर मुक्तता केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोनि. निशा जाधव, खेड पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेका स्वप्नील साळवी करीत आहेत.