रत्नागिरी:- मुसळधार पावसाबरोबरच वेगवान वारे वाहत असल्यामुळे मच्छीमारीला ब्रेक लागला आहे. शुक्रवारी सायंकाळी हर्णै बंदरातील दोनशे मच्छीमारी नौका जयगड, रत्नागिरीसह देवगड किनार्यावर आसरा घेण्यासाठी दाखल झाल्या आहेत. जयगड येथे मुंबईसह परजिल्ह्यातील काही नौका आल्या आहेत. खोल समुद्रात पाण्याला प्रचंड करंट असल्यामुळे धोका पत्करण्यापेक्षा मच्छीमारांनी बंदरावर येणे पसंत केले आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे त्याचे परिणाम अरबी समुद्रातही जाणवत आहेत. खोल समुद्रात वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. समुद्र खवळल्याने मासेमारी करणे अशक्य आहे. किनारी भागात वार्याचा वेग अधिक असल्याने एकावर एक मोठ्या लाटा आदळत आहेत. बिघडलेल्या वातावरणाचा तडाखा मासेमारीला ब
सला आहे. पर्ससिननेट मासेमारी सुरु होऊन आठच दिवस झाले असतानाच सुरवातीलाच ब्रेक घ्यावा लागला आहे. ट्रॉलिंगसह गिलनेटच्या नौकांही बंदरातच उभ्या आहेत. पाण्याचा प्रचंड करंट असल्यामुळे मासे पकडण्यासाठी जाळी टाकणे अशक्य आहे. लाटांमुळे नौका पाण्याच्या लाटांवर हलत असल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यताही आहे.
अनुचित प्रकार टाळण्यासाठी मच्छीमारांनी सुरक्षित बंदरावर नांगर टाकला आहे. हर्णै येथील 200 नौकांपैकी शंभर नौकांनी जयगड बंदरावर, रत्नागिरीत 50 तर देवगड (जि. सिंधुदुर्ग) येथे 50 नौका उभ्या आहेत. पाऊस आणि वारे थांबत नाहीत, तोपर्यंत नौका बंदरातच उभ्या राहतील असे मच्छीमारांनी सांगितले. दरम्यान, गेले काही दिवस मच्छीमारांना कानट मासा मिळत होता. ती फिशमिलला विकत दिली जात होती. अन्य मासळी मिळण्याचे प्रमाण कमीच आहे. वादळ सरल्यानंतर खोल समुद्रातील मासा किनार्याच्या दिशेने येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.