रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर वाढलेल्या गवतामुळे वारंवार वणवा लागण्याचा धोका वाढला आहे. मागील काही दिवसात असे प्रकार घडल्याने कोरे प्रशासन अलर्ट झाले आहे. ट्रॅक नजीकचे वाढलेले गवत कापण्यासह आजूबाजूच्या जमीन मालकांना गवत कापण्याचे आवाहन कोरे प्रशासनाने केले आहे.
कोकणात सध्याच्या दिवसात वणवे पेटण्याच्या घटना जागोजागी होतात. गेल्या काही दिवसात काही ठिकाणी कोकण रेल्वेच्या ट्रॅकच्या आजूबाजूच्या भागात वणवे पेटून आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. आजूबाजूच्या परिसरात लागलेले वणवे कोकण रेल्वेच्या ट्रॅकपासून काही अंतरावर रेल्वे प्रशासनाकडून विझवले गेले आहेत. सुदैवाने यात कोकण रेल्वेचे वित्तीय हानी झालेली नाही. मात्र मार्गावरून होणारी हजारो लोकांची प्रवासी वाहतूक लक्षात घेता ट्रॅक नजीकच्या जमीन मालकांनी याबाबतची खबरदारी घेणे गरजेचे आहे. ट्रॅक नजीक जमिनी असलेल्या जमीन मालकांनी ट्रॅकच्या बाजूचे आपल्या आवारातील गवत वेळीच काढले तर पुढील अनर्थ टळणार आहे.विशेषतः यापुढच्या दिवसात भाजावळीच्या कामाच्यावेळी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोकण रेल्वे प्रशासन ट्रॅकच्या आजूबाजूच्या परिसरात गवत वाढणार नाही याची खबरदारी घेत आहे. मात्र नजीकच्या जमीन मालकांनी तितकीच खबरदारी घेऊन सतर्क रहाणे गरजेचे आहे. ट्रॅकच्या नजीक जमीन असलेल्या जमीन मालकांना आपल्या आवारातील गवत वेळीच कापून टाकण्याचे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.