कोकणातील धरणांचा तयार होणार जलाशय प्रचलन आराखडा

रत्नागिरी:- बदललेले ऋतुमान आणि पावसाच्या वेळापत्रकात झालेल्या बदलाने कोकणातील पाण्याचे नियोजन बारगळले असून जलसंपदा विभागाने कोकणातील धरणामधील पाण्याचे नियोजन 15 जुलै ऐवजी 15 ऑगस्टपर्यंत करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या नुसार आता  नव्याने कोकणातील  धरण जलाशय प्रचलन आराखडा तयार करण्यात येणार आहे.  

धरणांमधील पाण्याचे नियोजन ब्रिटिश काळापासून आतापर्यंत प्रचलित पद्धतीनुसार होत होते. जलसंपदा दि. 15 जुलैपर्यंतचे नियोजन करते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून  मोसमी पावसाचे आगमन लांबणीवर पडत असल्याने धरणांमधील उपलब्ध पाण्याचे नियोजन  दि. 15 ऑगस्टपर्यंत करण्याचे प्रस्तावित आहे.
कोकणात सरासरी साडेतीन हजार मि.मी. पाऊस होतो. मात्र, पावसाचे अतिरिक्त पाणी सिंचनसाठा पूर्ण झाल्यानंतर समुद्राला जावून मिळते. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने  प्रचलित पद्धत बदलून नव्याने धरण जलाशय प्रचलन आराखडा तयार करण्याबाबत प्रस्तावित केले आहे.

मोसमी पाऊस माघारी परतल्यानंतर धरणांमधील उपलब्ध पाणीसाठयाचे पिण्याचे पाणी, शेतीसाठी लागणारे पाणी, उद्योग, विद्युत निर्मिती आणि आरक्षित पाणी आदींचे वर्षभरासाठीचे नियोजन करण्यात येते. जून महिन्यात मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर  जलसंपदा विभागाकडून दरवर्षी 15 जुलैपर्यंत पाणी नियोजन केले जाते.

मात्र, गेल्या चार-पाच वर्षांपासून पावसाचे आगमन जुलैपर्यंत लांबत आहे. वाढती लोकसंख्या, विकासकामे, वाढते उद्योग, शेतकर्‍यांचा खरिपाचा पेरणी हंगाम या गोष्टी लक्षात घेता प्रचलित धोरणानुसार पाण्याचे नियोजन कोलमडत
आहे.

त्यामुळे बदलत्या पर्जन्यमानामुळे जुलैऐवजी ऑगस्टच्या मध्यापर्यंत धरणांमधील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याबाबत जलसंपदा विभागाने सूक्ष्म आराखडा तयार करण्याचे सूचीत केले आहे. धरणातील पाण्याची साठवण क्षमता, गाळ, बाष्पीभवन, पाण्याचे लोकसंख्येनुसार वितरण, गळती, सिंचनासाठीची आवर्तने, पाणीचोरी, भविष्यकालीन उद्योग-व्यवसाय, विकासकामे, विद्युत निर्मिती आदींसाठी दिल्या जाणार्‍या पाण्याचा यामध्ये विचार करण्यात येत आहे.