रत्नागिरी:- गडद अंधारात समुद्राची गाज ऐकायला मिळत असतानाच अचानक किनार्यावर फुटणार्या लाटा निळ्याशार गडद रंगाने चमचम करताना दिसू लागतात. ते विलोभनिय दृश्य पाहील्यानंतर अंगावर रोमांच उभे राहते. हे दृश्य रत्नागिरीतील भाट्ये, आरे-वारे, रिळ, वरवडे किनारी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पहायला मिळते. स्थानिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत असलेल्या चमकणार्या लाटा म्हणजे कोकणात येणार्या पर्यटकांसाठी तर एक नवी पर्वणी आहे.
कोकणातील समुद्र किनार्यांवर यंदाही चमकणार्या लाटा पाहायला मिळत आहेत. गेल्या तीन ते चार वर्षात रत्नागिरी शहराच्या किनार्यांसह सिंधुदूर्ग किनार्यांवर हा अनुभव येत आहे. 2017 साली रत्नागिरीतील आरे-वारे समुद्रात हा अनुभव पहायला मिळाला. किनार्यावर येणार्या लाटा वेगवेगळ्या ठिकाणी निळ्या रंगाने प्रकाशमान होताना दिसतात. एकीकडे किनार्यावर आपटणार्या लाटा आणि दुसरीकडे चमचम करणारे ते पाणी हा अनुभव वेगळाच आहे. स्थानिक मच्छिमार याला पाणी पेटले किंवा जाळ असे म्हणतात. यापूर्वी त्याचे प्रमाण लक्षातही न येण्या इतके अत्यल्प होते. मात्र आता त्यांचे प्रमाण वाढल्यामुहे ते नजरेत येऊ लागले आहे. गेल्या चार वर्षाचा अनुभव असा आहे की थंडी चा मोसम सुरू झाला की कोट्यवधींच्या संख्येने ते प्लवंग रत्नागिरीच्या किनार्यावर येत आहेत. रत्नागिरीच्या किनार्यावरील लाटा फ्लोरोसंट लाईट पेटवावा तशा प्रकाशमान होतात. तापमानातील बदलामुळे हे जीव इतक्या मोठ्या संख्येत देशाच्या पश्चिम किनार्यावर आले असावेत असे या विषयाचे अभ्यासकांकडून सांगितले जाते.
याबाबत सागरी जीव अभ्यासक प्रा. स्वप्नजा मोहिते म्हणाल्या, रत्नागिरीच्या किनार्याच्या लाटा उजळून टाकणारे हे जीव आहेत प्लवंग. त्यांचे शास्त्रीय नाव नॉकटील्युका आहे. समुद्राच्या पाण्याबरोबर हे सूक्ष्म प्लवंग किनार्यावर येतात. जेव्हा ते एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येतात तेव्हा ते प्रकाशमान होतात. या प्राण्यामध्ये जैविक प्रकाश निर्माण करण्याची क्षमता असते. यामुळे किनार्यावर येऊन जेव्हा लाटा फुटतात तेव्हा ते प्रकाशमान होतात आणि संपूर्ण लाट उजळून जाते.