राजापूर:- कोकणकन्या एक्स्प्रेसमधून मुंबई ते गोवा असा प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे १ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख ६०० रुपये चोरट्याने लंपास केले. याप्रकरणी राजापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २६ ऑक्टोबर रोजी सकाळी घडला. फिर्यादी २६ ऑक्टोबर रोजी कोकणकन्या एक्स्प्रेसने प्रवास करत होत्या. सकाळी ८:३० ते ८:४० वाजण्याच्या सुमारास गाडी राजापूर ते वैभववाडी स्थानकांदरम्यान होती . या दरम्यान चोरट्याने फिर्यादीच्या बॅगेमधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम तसेच कागदपत्रे लंपास केली . ही बाब बऱ्याच वेळाने फिर्यादीच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी राजापूर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे.