रत्नागिरी:- केरळ येथून पळविलेल्या त्या अल्पवयीन मुलीचा दोन लाखाला सौदा झाल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र ज्या व्यक्तीसोबत हा सौदा झाला त्या व्यक्तीच्या ताब्यात ती मुलगी न गेल्याने सौदा करणार्या व्यक्तीने हा प्रकार उघडकीस आणल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. दरम्यान मुलीचा सौदा नेमका कोणत्या कारणासाठी झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार रत्नागिरीच्या ग्रामीण पोलिसांसह रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघडकीस आला होता. या मुलीला रेल्वेतून पळवून नेण्यात येत होते. मात्र केरळ पोलिसांनी कोकण रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला आणि रत्नागिरीत त्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र या कारवाईदरम्यान विकी नामक तिचा कथित प्रियकर व त्याचे साथीदार संधी साधून रत्नागिरी रेल्वे स्थानकातून पळून गेले होते.
ज्या ओखा एक्स्प्रेसमधून ही अल्पवयीन मुलगी विकी नामक तरूणासोबत राजस्थानला निघाली होती. ओखा एक्स्प्रेस ही ७० टक्के रिकामी होती. केवळ डी-१, डी-२ हे दोन डबे प्रवाशांनी भरले होते. यावेळी सीटवर बसण्यावरून त्या अल्पवयीन मुलीचा एका महिलेसोबत वाद झाला होता. ओखा एक्स्प्रेसमधून ही मुलगी गेल्याची माहिती मिळाल्यानंतर कोकणातील सर्वच रेल्वे पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. ही ट्रेन मडगाव येथून सुटल्यानंतर कणकवली येथे थांबते. त्यामुळे कणकवली येथे ही ट्रेन तपासण्याचा निर्णय घेण्यात आला.
कणकवली रेल्वे स्थानकात ओखा एक्स्प्रेस आली असता त्या ठिकाणी रेल्वे पोलीस व स्थानिक पोलीस यांनी संयुक्तरित्या तपासणी केल्याची माहिती पुढे आली आहे. कणकवलीत रेल्वे तपासूनदेखील पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे कणकवलीत पोलिसांना अपयश आले. कणकवलीनंतर या ओखा एक्स्प्रेसचा पुढील थांबा रत्नागिरी असल्याने नेहमीप्रमाणे ही ट्रेन प्लॅटफॉर्म क्र. २ वर आली. त्याचवेळी ग्रामीण पोलीस व रेल्वे पोलीस यांनी संयुक्तरित्या पथक करून ट्रेनमध्ये तपासणी करण्यास सुरूवात केली. ओखा एक्स्प्रेसची रत्नागिरी रेल्वे स्थानकात तीनवेळा तपासणी झाली. तब्बल २५ मिनिटे ही गाडी थांबविण्यात आली. एवढं काय झालंय हे प्रवाशांनादेखील कळत नव्हते. तीनवेळा तपासणी करूनसुद्धा त्या मुलीचा व तिच्या साथीदाराचा थांगपत्ता लागला नाही.
कणकवली पाठोपाठ रत्नागिरी रेल्वे स्थानकात गाडी तपासण्यात आली. तरीदेखील त्या अल्पवयीन मुलीचा थांगपत्ता लागला नाही. अखेरीस ग्रामीण पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांनी त्या मुलीचा फोटो डी-१ या डब्यामधील प्रवाशांना दाखविला आणि सारा प्र्रकार उघडकीस आला. ओखा एक्सप्रेसमधून मडगाव येथील एक शिक्षिका प्रवास करीत होती. ही महिला डी-१ डब्यात होती. तिला पोलिसांनी फोटो दाखविला असता तिने त्या मुलीला ओळखले. या मुलीबरोबर प्रवासात वाद झाल्याचेदेखील शिक्षिका असलेल्या त्या महिलेने पोलिसांना सांगितले.
याचदरम्यान डब्यातील एक टॉयलेट बंद असल्याची माहिती प्रवाशांनी पोलिसांना दिली. यावेळी पोलिसांनी टॉयलेट उघडण्याचा प्रयत्न केला मात्र आतून लॉक असल्याने बंद असलेले टॉयलेट उघडता आले नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. बंद टॉयलेटमध्ये कोणीतरी आहे असा संशय पोलिसांना आल्यानंतर त्यांनी बाहेरून आवाज देऊन टॉयलेट उघडण्याची विनंती केली. मात्र आतमधून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेरीस पोलिसांनी बाहेरून टॉयलेटची काच फोडली आणि सार्या प्रकाराचा उलगडा झाला. ओखा एक्स्प्रेसच्या डी-१ मधील टॉयलेटमधून लपून त्यामुलीचा प्रवास सुरू होता. टॉयलेटची काच फोडल्यानंतर ती मुलगी टॉयलेटमध्ये मिळून आली. पोलिसांनी त्या मुलीला ताब्यात घेतले. चौकशीवेळी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
त्या मुलीचा केरळ येथे दोन लाखाला सौदा झाला होता. नेमका हा सौदा कोणत्या कारणासाठी झाला? मुलगीची विक्री नेमकी कोणत्या कारणासाठी झाली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र ज्या व्यक्तीसोबत सौदा झाला त्या व्यक्तीच्या ताब्यात मुलगी न मिळाल्याने हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, या प्रकरणातील ती अल्पवयी मुलगी बुधवारी केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. केरळ पोलिसांचे एक पथक बुधवारी रत्नागिरीत आले होते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून केरळ पोलिसांनी त्या मुलीचा ताबा घेतला. त्या मुलीला घेऊन केरळ पोलीस रवाना झाले. या मुलीचा सौदा झाल्यानंतर ती मुलगी विकी नामक तरूण व त्याच्या साथीदारांसोबत केरळ येथून पसार झाली. या मुलीचे राजस्थान कनेक्शन याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून विकीसह त्याच्या साथीदारांचादेखील केरळ पोलीस शोध घेत आहेत.