पत्तन विभाग; ५३ कोटीच्या निधीला मंजुरी
रत्नागिरी:-रत्नागिरी तालुक्याचे समुद्र उधाणाच्या भरतीपासून पूर्ण संरक्षण होणार आहे. पत्तन विभागाने पाठविलेल्या एकूण ३० धूप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या प्रस्तावापैकी १७ प्रस्तावांना शासनाने मंजुरी दिली आहे. सुमारे ५३ कोटीचे हे बंधारे असून १६ बंधारे एकट्या रत्नागिरी तालुक्यातील आहेत. एक बंधारा गुहागर तालुक्यातील आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील किनारपट्टी भागातील लोकवस्तीत शिरणाऱ्या पाण्याला प्रतिबंध बसणार आहे.
पावसाळ्यात आणि उधाणाच्या भरतीमध्ये जिल्ह्याच्या किनारी भागाची मोठ्या प्रमाणात धूप होते. यामध्ये प्रामुख्याने रत्नागिरी, गुहागर, दापोली, मंडणगड आणि राजापूर या पाच तालुक्यांना याचा फटका बसतो. तौक्ते वादळात तर ते पुन्हा आधोरेखित झाले. उधाणामुळे किनारपट्टीची प्रचंड धूप होऊन समुद्राचे पाणी आता मानवी वस्तीमध्ये शिरत आहे. किनारपट्टीवरील नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागते. याचा सारासार विचार करून येथील पत्तन विभागाने या किनाऱ्यांच्या संरक्षणासाठी आणि धूप रोखण्यासाठी जिल्ह्यातील ३० किनारी भागात बंधारे बांधण्याचे प्रस्ताव शासनाला सादर केले होते. यामध्ये अनेक परवानग्या असल्याने आणि सीआरझेडचा विषय असल्याने हे प्रस्ताव अनेक दिवस खोळंबले होते; मात्र नुकतीच शासनाने ३० बंधाऱ्यांपैकी १७ धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांना शासनाने मंजुरी दिली आहे. ५३ कोटीचे प्रस्ताव आहेत.
शासनाने २०२१-२२ या आर्थिक वर्षांसाठी जिल्ह्यात १७ धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांना मान्यता दिली आहे. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील १६ तर गुहागर येथील एका बंधाऱ्यांना मंजुरी दिली आहे. सोमेश्वर धूपप्रतिबंधक बंधारा ७ कोटी रुपये, पोमेंडी ७ कोटी, जुवे ७ कोटी, पूर्णगड येथील मुरकर यांचे घर ते फडनाईक यांच्या घरापर्यंतचा बंधारा १ कोटी, पूर्णगड शितापेवाडी ते खारवीवाडा संरक्षक भिंत १ कोटी, पावस धूपप्रतिबंधक बंधारा १ कोटी ५० लाख, गोळप मोहल्ला येथील बंधारा १ कोटी ५० लाख, मावळंगे १ कोटी ५० लाख, गावडे आंबेरे १ कोटी, मांडवी धूपप्रतिबंधक बंधारा २ कोटी ५० लाख, नांदिवडे ६ कोटी, संदखोल २ कोटी ५० लाख, जयगड अकबर मोहल्ला ते जेट्टी बंधारा ६ कोटी, काळबादेवी ४ कोटी, जयगड साखर मोहल्ला २ कोटी आणि वरवडे १ कोटी हे सर्व बंधारे रत्नागिरी तालुक्यातील आहेत. यामुळे संपूर्ण रत्नागिरी तालुक्याच्या किनारपट्टी धूप थांबून नागरिकांचे संरक्षण होणार आहे. त्यापैकी गुहागर बाजारपेठ ३ कोटी ५० लाखाचा एक बंधारा मंजूर झाला आहे.