कसोप येथे दुचाकी घसरून तरुणाचा जागीच मृत्यू

रत्नागिरी:- शहरानजिकच्या कसोप येथे दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकी अपघात झाला. या अपघातात स्वाराचा जागीच मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

 संकेत संजय देसाई (वय ३०, रा. कसोप, रत्नागिरी) असे मृत स्वाराचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २२) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी संकेत आपल्या ताब्यातील दुचाकीवरून कसोप येथील आपल्या घरी जात होता. त्यावेळी दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी घसरून हा अपघात झाला. यात संकेतला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा करून संकेतचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.