कंत्राटी आरोग्य सेविकांचे तीन दिवसीय धरणे आंदोलन सुरू

रत्नागिरी:- जिल्हा परिषद अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) मध्ये काम करणार्‍या कंत्राटी आरोग्य सेविकांना नियमित रिक्त पदांवर समायोजन करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आरोग्य सेविकांना जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. 3 दिवस हे आंदोलन चालणार आहे.

या आंदोलनाबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. मागील 15 ते 20 वर्षांपासून अतिशय तुटपूंजा मानधनावर खेडोपाडी व शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधी निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी इ. संवर्गात कंत्राटी कर्मचारी प्रामाणिकपणे आरोग्य सेवा देत आहेत. नुकत्याच कोरोना महामारीत आपल्या कुटुंबाची पर्वा न करता देवदुतासारखे रात्रंदिवस आरोग्य सेवा दिली आहे. परंतू मागण्यांबाबत अनेकवेळा निवेदन देवून सुद्धा दुर्लक्ष केले गेले आहे,असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शासन आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी ÷अधिकारी, कर्मचारी, समायोजन कृती समितीबरोबर 20 मार्च 2023 मध्ये बैठक पार पडली होती. या बैठकीत आरोग्य सेविका व इतर कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढ करण्यात येईल, तसेच समायोजन करण्याकरिता लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले गेले होते. यानंतर 31 मार्च 2023 पर्यंत समायोजन करण्यात येईल, असे स्पष्ट सांगितले गेले. मात्र आता सात महिने होऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. यामुळे आता टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येणार आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

जिल्हापरिषदेसमोर बुधवारपासून या कंत्राटी आरोग्य सेविकांना धरणे आंदोलन करण्यास सुरुवात केले आहे. जिल्ह्यातील 100 पेक्षा जास्त आरोग्य सेविका या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटकर व सेजल रसाळ यांच्या उपस्थितीत हे आंदोलन सुरु आहे. तीन दिवसाचे हे आंदोलन असून शुक्रवारपर्यंत हे आंदोलन चालणार आहे.

जिल्हा परिषदेसमोर बुधवारी सकाळपासून हे धरणे आंदोलन सुरु आहे. मात्र या आंदोलनाकडे प्रशासकीय अधिकार्‍यांनी पाठ फिरवली आहे. साधी या आंदोलकांची चौकशीही न केल्याची माहिती पुढे आहे. वास्तविक अधिकार्‍यांच्या येण्या-जाण्याचा हाच रस्ता आहे. असे असताना या आंदोलकांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.