रत्नागिरी:- ऑनलाईन ई-पिक पाहणी न केल्याने अनेक शेतकरी शासन आधारित भात विक्रीपासून वंचित राहिले आहेत. मुळातच ई-पीक नोंदणी प्रक्रिया बर्याच शेतकर्यांपर्यंत न पोहचल्याने ही स्थिती ओढवली आहे.
दुष्काळ, मुसळधार पाऊस, गारपीट, चक्रीवादळ, पूर, अवकाळी पाऊस यांसारख्या कारणांमुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते. पिकांच्या पेरणीची नोंदणीही कागदोपत्री होत असल्याने शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळण्यास विलंब होत होता; मात्र, या सर्व समस्यांचा विचार करून गतवर्षीपासून शेतकर्यांच्या पीक पेरणीची माहिती अॅपद्वारे गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी स्वतः शेतकर्यांनी उपलब्ध करून देण्याचा ई-पीक पाहणी कार्यक्रम राबविला.
शेतकर्यांच्या पीक पेरण्यांची नोंद ही पूर्वी तलाठ्यांमार्फत केली जात होती. परंतु तलाठ्यांची कमी संख्या तसेच तलाठ्यांची वाढती कामे यामुळे त्यांना शेतीची पाहणी करून पीक पेरणीची अचूक नोंद करणे शक्य होत नाही. त्यामुळे एखादी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास शेतकर्यांना भरपाई देण्यास अडचण निर्माण होत असे. त्यामुळे या सर्व अडचणींचा विचार करून शेतकर्यांनी पेरलेल्या पिकाची अचूक नोंद शासनाच्या अभिलेखामध्ये व्हावी आणि त्याचा शेतकर्यांनाही संकटकाळात नुकसान भरपाईसाठी जलद गतीने लाभ व्हावा, हा उद्देश समोर ठेवून ई-पीक पाहणीचा प्रकल्प राबविण्यात आला. संबंधित कार्यक्रमात कशी नोंद करावी, यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. मात्र जिल्ह्याचा विचार करता ठराविक शेतकर्यांनी याचा लाभ घेतला.मात्र, अजून असे काही शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत ही योजना अद्यापपर्यंत पोहचलीच नाही.
बर्याचजणांना संबंधित अॅपमध्ये माहिती कशी भरावी हे समजलेच नाही. काही शेतकरी मोबाईल तंत्रज्ञान क्षेत्रात साक्षर नाहीत. अनेक जणांना ई-पिक नोंदणी आपण स्वतः पुढाकार घेऊन करायची आहे, हे माहितच नव्हते. त्यामुळे शेतकरी ई-पीक पाहणी ऑनलाईन करु शकले नाहीत.
आता खरिपाची कापणी व इतर प्रक्रिया करुन भात विक्री करायच्या वेळी आपली नोंदणी नसल्याचे या शेतकर्यांच्या लक्षात आले असे निदर्शनास आले आहे.
नोंदणी नसल्याने सरकारी आधारभूत किंमतीत भात खरेदी केंद्रांवर अशा शेतकर्यांचे भात घेण्यास नकार मिळाला. यामुळे नोंदणी न झालेले शेकडो शेतकरी अडचणीत आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी खरेदी विक्री संघात भात विक्रीची नोंद कमी प्रमाणात झाली. सद्यस्थितीत 2 हजार 200 पर्यत क्विंटलला दर आहे. हाच दर खासगी विक्रीमध्ये खूपच कमी आहे. यामुळे नोंदणी न झालेल्या शेतकर्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे