एमआयडीसीत दिवसाढवळ्या महिलांनी घरात घुसत केली जबरी चोरी

रत्नागिरी:- शहराला लागून असणाऱ्या एमआयडीसी भागात दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. जे के फाईल्स जवळ राहणाऱ्या कल्पना भिसे यांच्या घरात पाच ते सहा महिलांनी घुसून त्यांच्या घरातील कपाटातून सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास हि घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कल्पना भिसे या एमआयडीसी येथे रहातात. याच घराला लागून त्यांच्या मुलाची एक जाहिरात कंपनी आहे. आज दुपारी २ च्या सुमारास या जाहिरात कंपनीत काम करणाऱ्या मुली जेवायला बसलेल्या असताना पाच ते सहा महिलांनी या ठिकाणी प्रवेश करीत कपाटातील दागिने लंपास केले. या महिला घरात घुसल्याचे लक्षात येताच कल्पना भिसे आणि त्यांच्या महिला कर्मचारी वर्गाने देखील त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मात्र या वेळेत हाताला लागेल त्या वस्तू उचलून या महिलांनी नेल्या. राजस्थानी पेहेरावात असणाऱ्या या महिलांसोबत एक लहान मुलगी देखील असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या घटनेनंतर श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले होते. शहर परिसरात या महिलांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. तसेच शहर पोलीस स्थानकात याबाबत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.