आर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदीत घोळ

चढ्या दराने खरेदी; विक्रांत जाधव यांची चौकशीची मागणी

रत्नागिरी:- कोरोना कालावधीत जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून जुन महिन्यात आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले होते. त्या गोळ्या चढ्या दराने घेण्यात आला असून त्यांची आरोग्य संचालकांमार्फत चौकशी करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांनी स्थायी समितीत केली.

जिल्हा परिषद स्थायी समितीची बैठक गुरुवारी (ता. 29) झाली. कोरोना कालावधीत प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष प्रयत्न सुरु होते. एप्रिलनंतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. त्याचवेळी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटप करण्याचा निर्णय झाला. त्या गोळ्या तयार करण्याचे काम कोणत्याही अधिकृत कंपनीला देण्यात आले नव्हते. त्या जिल्हा शासकीय रुग्णालयातच बनविण्यात आल्या होत्या. तेथील औषध निर्मिण विभागाकडून एका वैद्यकीय अधिकार्‍याच्या देखरेखीखाली बनवल्या गेल्या. संबंधित डॉक्टरना अशा प्रकारे गोळ्या बनविण्याचा कोणताही अधिकार नाही. ते डॉक्टर रुग्णाला तपासून गोळ्या देऊ शकतात; परंतु अशाप्रकारे विक्रीसाठी करु शकत नाहीत. त्या गोळ्यांच्या बॉटल्सवर एक्सपायरी तारीख, बॅच नंबर, परवाना नंबर अशी कोणतीही माहिती दिलेली नव्हती. तसेच त्यांच्याकडे अशा गोळ्या तयार करण्याचा परवानाही नव्हता. औषध खरेदीचा कोटेशन बनवून न घेताच तज्ज्ञ कंपनीला काम दिलेले नाही. तसेच गोळ्यांचे दरही अव्वाच्या सव्वा लावण्यात आले आहेत असे मुद्दे विक्रांत जाधव यांनी मांडले. याबाबत संबंधितांना सभागृहात बोलावण्यात आले होते; परंतु त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. या प्रकाराची आरोग्य संचालक मुंबई, सहसंचालक आरोग्य विभाग पुणे यांच्यासह राज्य सरकारच्या लेखा व वित्त विभागाकडून खरेदीची चौकशी झाली पाहीजे अशी मागणी केली आहे. सॅनिटायझरच्या बॉटेल्सचाही असाच प्रकार असून दोन्हीचे दर वाढवून लावले होते. हा मुद्दा अध्यक्ष रोहन बने यांनी नोंद करुन घेतला असून त्यावर योग्य कार्यवाही होईल असे विक्रांत जाधव यांनी सांगितले.