रत्नागिरी:- आर्जु टेक्सोल कंपनीच्या माध्यमातून सुमारे ५ कोटी ९३ लाखांची फसवून केल्या प्रकरणात पोलिसांनी तिसऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संजय विश्वनाथ सावंत (33 राहणार पुनस-सावंतवाडी, तालुका लांजा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तिसऱ्या आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावताच पोलिसांनी या आरोपीचा ताबा घेतला आहे.
२३ मे रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात आर्जु कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील आरोपींमार्फत आर्जु टेक्सोल कंपनी स्थापन करून “जॉब वर्क पध्दतीने काम घ्या. आम्हाला प्रोडक्ट तयार करून दया, जास्तीत जास्त उत्पादने तयार करण्यासाठी व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना रोजगाराची सुवर्ण संधी” अशा स्वरुपाची जाहीरात पत्रके छापून वाटण्यात आली होते. तसेच आरोपींनी फिर्यादी व गुंतवणुकदार यांना २५ हजार ते ४० हजार डिपॉजिटच्या १५ महिने, ३६ महिने व ६० महिने या कंपनीच्या स्किम सांगुन कंपनीमध्ये डिपॉजिट ठेवलेल्या रक्कमेवर गुंतवणुकदारांना आकर्षक परताव्याचे अमिष दाखविले. तसेच गुंतवणूकदारांकडून वेगवेगळी घरघुती व किरकोळ उत्पादने बनविण्याकरिता वेगवेगळी रक्कम ठरवून डिपॉजिट घेण्यात आले. या माध्यमातून गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.
या गुन्ह्यामध्ये, आरोपी यापूर्वी प्रसाद शशिकांत फडके (34, वर्षे, रा. गावखडी) आणि संजय गोविंद्र केळकर यांना अटक करण्यात आली होती. या गुन्हयातील तिसरा आरोपी संजय विश्वनाथ सावंत (33 राहणार पुनस-सावंतवाडी, तालुका लांजा) याने बुधवारी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता अर्ज सादर केला होता. परंतु न्यायालयाने आरोपी संजय विश्वनाथ सावंत याचा जामीन अर्ज फेटाळून लावताच पोलिसांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपी संजय विश्वनाथ सावंत याला दिनांक २९ जुन पर्यंत पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे.
या गुन्हयाच्या तपासामध्ये आर्थिक गुन्हे शाखेमार्फत आतापर्यंत कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, पुणे, औरंगाबाद व सातारा जिल्ह्यातील बळी पडलेल्या एकूण ५२५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच फसवणूक झालेली रक्कम ५ कोटी ९२ लाख ६९ हजार ८६६ इतकी आहे.