रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून कोकण प्रादेशिक पक्षातर्फे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या शकील सावंत यांना प्रचारादरम्यान पूर्णगड येथे अश्रफ सारंग यांनी अडथळा करत श्री.सावंत यांच्या अंगावर धावून आपल्याला धोका निर्माण झाल्याची तक्रार उमेदवार शकील सावंत यांनी पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. तर प्रचारादरम्यान आपल्याला धोका असून आपल्याला तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणी श्री.सावंत यांनी केली आहे.
उमेदवार श्री.शकील सावंत यांनी पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनानुसार दि.9 एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजता पूर्णगड गावामध्ये प्रचार करत असताना अश्रफ सारंग नावाच्या व्यक्तीने प्रचाराला अडथळा करून अंगावर धावून आला. तर सुवर्णभास्कर व्हॉटस्ॲप ग्रुपवरील स्क्रिनशॉर्टनुसार कर्ला, नवा कर्ला बांध, आदमपूर, निवखोल, शिवखोल या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नदीम सोलकर यांनी मेसेजद्वारे सांगितले की कोणी मुस्लीम अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत असला तरी समाज त्यांना मतदान करणार नाही. कारण अपक्ष उमेदवाराला मत म्हणजे भाजपला त्याचा फायदा होणार आहे. मुस्लीम मताचे विभाजन करण्यासाठी ओवैसी पॅटर्न कोकणात राबविला जात आहे. असा प्रचार करून खोटे आरोप लावून माझ्याविरोधात अपप्रचार सुरू आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान मला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी श्री.सावंत यांनी केली आहे.