लांजा:- अघोरी पद्धतीने १२ वर्षीय बालकावर मसाज करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी लांजा तालुक्यातील भांबेड तेलीवाडी येथील नारायण येसू शेलार या ६२ वर्षीय व्यक्तीवर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १९ नोव्हेंबर २०२३ रोजी घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी नारायण शेलार याच्याकडे मसाज अगर कोणत्याही प्रकारचा उपचार करण्याचा परवाना नाही. ही व्यक्ती मसाजद्वारे उपचार करते याची माहिती घेऊन कल्याण घाडगे हे आपला १२ वर्षाचा मुलगा यश कल्याण घाडगे (राहणार आंबवडे वाघोली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा) याला घेऊन आले होते. यश हा लहानपणापासूनच दिव्यांग होता. मात्र मसाज केल्याने त्याचा जीव जाऊ शकतो याची जाणीव असतानादेखील नारायण शेलार याने १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० सुमारास यश घाडगे याचा मसाज केला. त्याच्या पाठीपासून दोन्ही पायापर्यंत तेल, बाम आणि इतर औषधे लावली. पायावर आणि पाठीच्या मणक्यावर वजनदार दगडी जाते फिरवले.
तसेच त्याला उभा करून त्याचे दोन्ही पाय व मान ओढूनताणून असह्य वेदना होईपर्यंत मसाज केला. यामध्ये यश याचा श्वास आणि हालचाल बंद झाल्याने त्याला प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र भांबेड आणि तेथून अधिक उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या ठिकाणी दुपारी २.३० वाजता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले होते. अशाप्रकारे अघोरी पद्धतीने यशचा मसाज करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी नारायण शेलार याच्यावर भा.दं.वि. कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे हे करत आहेत.