अक्षय तृतीयेलाही फळांचा राजा तेजीत

रत्नागिरी:- अवकाळी पाऊस, लहरी हवामानाने हापूसला फटका बसला आहे. शेवटच्या टप्प्यातील हापूस आता तयार होऊ लागला आहे. ते गणितही हवामानावर अवलंबून आहे. सध्या वाशी बाजारपेठेत अपेक्षित आवक कोकणातून येत नसल्याने अक्षय तृतीयेला दर चढेच राहणार आहेत. खवय्यांनाही खरेदी करताना हात आखडता घ्यावा लागणार आहे.

नवी मुंबई बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये सध्या कोकणातील हापूसची आवक कमी होत असून, इतर राज्यातील आंब्याची आवक वाढत आहे. बाजारात हापूस मागणीच्या तुलनेत कमी उपलब्ध होत असल्याने इतर राज्यातील आंबा खरेदीला ग्राहकांचा कल वाढत आहे. यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत हापूसची आवक वाढली होती. परंतु, हापूसचा खरा हंगाम हा एप्रिल-मे महिन्यात सुरू होतो. मात्र, आता आवक कमी होत असून, मागील वर्षी एप्रिलमध्ये हापूसच्या ७०-८० हजार पेट्या दाखल होत होत्या, परंतु यंदा २५-३५ हजार पेट्याच दाखल होत आहेत. यावर्षी वळीव पावसाने हंगामाला उशिराने सुरुवात झाली. वळीव पावसाने उत्पादनाला फटका बसेल या भीतीपोटी शेतकऱ्यांनी वेळेआधीच हापूसची तोडणी केली. त्यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये चार पटीने आवक वाढली. एप्रिल-मे मध्ये दरही अवाक्यात असतात. त्यामुळे सर्वसामान्यांची पावले हापूस खरेदीकडे वळतात. परंतु सध्या घाऊक बाजारात आवक कमी होत असून, हापूसचे दर चढेच आहेत.
अक्षय तृतीयेला हापूसची आवक दरवर्षी वाढते. यंदा पूर्वसंध्येला शुक्रवारी (ता. 20) वाशीमध्ये अवघ्या 15 हजार पेट्या हापूसच्या दाखल झालेल्या आहेत. गतवर्षी याच कालावधीत ५० हजार पेटी आंबा कोकणातून वाशीत गेला होता. आवक वाढल्याने प्रति डझन हापूसचा दर ४०० ते १००० रुपये पर्यंत आहे. ४ ते ६ डझन पेटी २ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी विक्री होत आहे. तेच मागील वर्षी एप्रिलमध्ये यंदाच्या तुलनेत हापूसचे दर २०० ते ५०० रुपयांनी कमी होते. दर चढेच असल्याने ग्राहकांचा खिसा खाली झाला आहे.